नागपूर गुन्हे शाखेची वाहनचोरावर कारवाई; चोरीची दुचाकी जप्त, एक आरोपी अटकेत

लकडगंज येथील वाहन चोरीचा गुन्हा उघड; ₹75 हजार किमतीची दुचाकी हस्तगत, पुढील तपास सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली सुमारे ₹75 हजार किमतीची हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकी जप्त करण्यात आली असून, पुढील तपास लकडगंज पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी फिर्यादी शाम मधुकर जोगे (वय ५३) यांनी त्यांची हिरो होंडा सीडी डिलक्स (क्रमांक एमएच-३१-बीएम-५७५५) ही दुचाकी दारोडकर चौक येथील सर्वोदय बिल्डिंगसमोर पार्क करून लॉक केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी नियमित गस्त घालत असताना एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. तो हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकीवर फिरताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली.
चौकशीत त्याने आपले नाव तेजराम उर्फ तेजस जगदीश आडे (वय ३१), रा. कोंडा, ता. पवनी, जि. भंडारा असे सांगितले. मात्र, वाहनाबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वाहनाची पडताळणी केली. तपासादरम्यान संबंधित दुचाकी ही लकडगंज पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे ₹75 हजार किमतीची चोरीची दुचाकी जप्त करून आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसाखळी चोरी विरोधी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगला हारडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
वेळीच केलेल्या या कारवाईमुळे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस येत चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात नागपूर पोलिसांना यश आले असून, वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



