AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बडनेऱ्यात अँटी-व्हेनम इंजेक्शनचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करण्याची मागणी

सर्प मित्र संघटनेचे मोदी हॉस्पिटल प्रशासनाला निवेदन; सर्पदंशाच्या रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावेत, अशी अपेक्षा

अमरावती | प्रतिनिधी

बडनेरा आणि परिसरातील सर्पदंशाच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी नवी वस्ती येथील मोदी हॉस्पिटलमध्ये अँटी-व्हेनम इंजेक्शनचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी सर्प मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरसेवक अजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र राजकुमार यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात सर्पदंश झाल्यानंतर पहिल्या काही तासांतील उपचार, म्हणजेच ‘गोल्डन अवर’, रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे बडनेरा आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी स्थानिक स्तरावर अँटी-व्हेनम इंजेक्शनची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

सर्प मित्र संघटनेच्या वतीने अनेक वर्षांपासून स्वेच्छेने सर्प रेस्क्यूचे कार्य करणारे हीरा लक्ष्मण स्वामी, राहुल गणेश वानखेडे आणि ऋतिक राजू ढोके यांनी सर्पदंशाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी मांडली. त्यांनी रुग्णांना तातडीने उपचार न मिळाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

सध्या अँटी-व्हेनम इंजेक्शनची सुविधा प्रामुख्याने अमरावती येथील इर्विन रुग्णालयात उपलब्ध आहे. मात्र, बडनेरा आणि परिसरातील रुग्णांना तेथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, वाहतूक कोंडी आणि अंतर यामुळे उपचारात विलंब होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर मोदी हॉस्पिटलमध्ये अँटी-व्हेनम इंजेक्शनचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सर्प मित्र संघटनेने स्पष्ट केले. यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र राजकुमार यांनी हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते मनोज गजभिये, सुशील बोरकर, सर्प मित्र संघटनेचे अध्यक्ष हीरा अण्णा स्वामी, राहुल वानखेडे, ऋतिक ढोके तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल यांनी बडनेरा आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी हॉस्पिटलमध्ये अँटी-व्हेनम इंजेक्शनची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. ही सुविधा सुरू झाल्यास सर्पदंशाच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button