AmravatiCorporationAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

जेवड शाळेत बालसंसद निवडणुकीतून लोकशाहीचा धडा; SIR मोहिमेबाबत विद्यार्थ्यांकडून जनजागृती

प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत मतदार नोंदणीचा संदेश पोहोचविला

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेच्या जेवड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जोपासना करण्याबरोबरच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी बालसंसद निवडणुकीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया अनुभवत लोकशाहीचे महत्त्व जाणून घेतले आणि पालकांपर्यंत मतदार नोंदणीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला.

या बालसंसद निवडणुकीची प्रक्रिया १७ जुलैपासून सुरू झाली. मतदार यादी प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप, प्रचार, आचारसंहितेचे पालन, मतदान, मतमोजणी आणि ३० जुलै रोजी शपथविधी व खातेवाटप अशा संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करण्यात आले.

निवडणुकीत पंतप्रधान, उपपंतप्रधान, शिक्षण मंत्री, ग्रंथालय मंत्री, स्वच्छता मंत्री, शिस्त मंत्री, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री आणि क्रीडा मंत्री अशा विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उत्साहाने उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली. प्रचारापासून मतदानापर्यंत प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष, नोंदणी अधिकारी, मतदारांच्या बोटाला शाई लावणारे कर्मचारी अशा सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनीच अत्यंत शिस्तबद्ध आणि जबाबदारीने पार पाडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव मिळाला आणि लोकशाही प्रक्रियेबाबत त्यांची समज अधिक दृढ झाली.

या उपक्रमाचा प्रमुख उद्देश पालकांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. “मतदार यादीत नाव नसेल तर मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यामुळे SIR प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे,” हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.

या अभिनव उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत नालसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी केले. तसेच शाळेतील BLO आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेत हा जनजागृती उपक्रम यशस्वी केला.

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, जबाबदार नागरिकत्वाची जाणीव आणि मतदान प्रक्रियेचे महत्त्व रुजविण्याबरोबरच समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button