AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बडनेरा पोलिसांचा बनावट सिमेंट रॅकेटचा पर्दाफाश; अल्ट्राटेकच्या नावाने सुरू होता बेकायदेशीर व्यवसाय

पोल्ट्री फार्मवर छापा टाकून लाखो रुपयांचा बनावट सिमेंटसह साहित्य जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील बडनेरा पोलिसांनी बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या सिमेंटची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या छाप्यात अल्ट्राटेक (UltraTech) कंपनीच्या नावाने बनावट सिमेंटची विक्री सुरू असल्याचे उघड झाले. या कारवाईत लाखो रुपयांचा बनावट सिमेंट आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित आरोपीविरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा परिसरातील अंजनगाव बारी ते माजरी मसला रोडवरील एका शेतातील टिनशेड असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये बेकायदेशीररीत्या बनावट सिमेंटची विक्री सुरू होती. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला. तपासणीदरम्यान तेथे ‘UltraTech’ कंपनीच्या नावाची सुमारे ८०० सिमेंटची पोती (अंदाजे किंमत ₹२ लाख ५६ हजार), ‘Super UltraTech’ नावाची १४५ पोती, तसेच ‘NOT FOR RESALE’ असा उल्लेख असलेली २५ सिमेंटची पोती आढळून आली. याशिवाय रिकामी सिमेंट पोती, लोखंडी कुप्पी, घमेली, पावडे आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले.

कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित मजुरांकडे चौकशी केली असता हा व्यवसाय शेख युसूफ शेख बब्बू याचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधितांकडे व्यवसायासाठी आवश्यक परवाने व कागदपत्रांची मागणी केली असता समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर UltraTech कंपनीचे सर्चिंग ऑफिसर नितीन ठाकरे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी तपासणी करून जप्त करण्यात आलेले सिमेंट बनावट असल्याची खात्री दिली.

या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बनावट सिमेंटच्या वापरामुळे इमारतींच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन गंभीर अपघात घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सिमेंट खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनमंत उरलागोंडावार, क्राईम पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे तसेच बडनेरा पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button