दुधाळा–गोंडीटोला मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात; विद्यार्थी व नागरिकांचा जीव धोक्यात

रामटेक परिसरातील प्रमुख संपर्क रस्त्याची दुरवस्था; तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
रामटेक | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरालगत असलेला दुधाळा ते गोंडीटोला हा प्रमुख संपर्क मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्डे दिसत नसून अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
रामटेक शहरालगत सोनेघाट ग्रामपंचायत हद्दीतील हा महत्त्वाचा रस्ता अनेक गावांना जोडणारा प्रमुख संपर्क मार्ग आहे. या मार्गावरून दररोज नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र, रस्त्याची मोठ्या प्रमाणावर झीज झाल्याने ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी वाहने खड्ड्यांमध्ये अडकण्याच्या तसेच दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे न दिसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
या मार्गावरून शिक्षणासाठी रामटेकला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, सोनेघाट ग्रामपंचायतचे सरपंच किरण टेकाम यांनी दुधाळा–गोंडीटोला मार्गासोबतच मुसेवाडी चौघान ते भिलेवाडा हा रस्ताही 2008 पासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे सांगितले. या दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी त्यांनी मागणी केली.
ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांनी स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रस्त्यांची पाहणी करावी, खड्डे बुजविण्याचे तात्काळ आदेश द्यावेत तसेच कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने वेळीच या समस्येची दखल घेतली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.



