मनपा आयुक्तांचा दक्षिण झोनचा पाहणी दौरा; स्वच्छता, अतिक्रमण आणि नागरी सुविधांचा घेतला आढावा

नागरिकांशी थेट संवाद; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणणे आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दक्षिण झोन क्रमांक ४ मधील विविध भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
दौऱ्याची सुरुवात बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून करण्यात आली. येथे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा, रस्त्यांची स्थिती तसेच अतिक्रमणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर मटन मार्केट परिसरात स्वच्छता, आरोग्यविषयक बाबी आणि व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध नागरी सुविधांची तपासणी करण्यात आली.
रजा नगर परिसरात आयुक्तांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. संबंधित विभागांनी समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर आलमास गेट चौकात वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, अतिक्रमण आणि नागरी सुविधांची पाहणी करण्यात आली. तसेच महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक ३ आणि १० येथे इमारतींची स्थिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
प्रभाग क्रमांक २० मधील गोपाल नगर टी-पॉइंट, जेवड महानगरपालिका शाळा आणि सामरा नगर परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते, गटारी आणि सार्वजनिक सुविधांची तपासणी करण्यात आली. प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.
जुनी वस्ती येथील महानगरपालिका शाळेच्या खुल्या भूखंडाचा योग्य वापर तसेच जीर्ण झालेल्या शाळा इमारतीच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याशिवाय स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा आणि प्रकाश व्यवस्था सुधारण्यावरही भर देण्यात आला.
श्रीकृष्ण मंदिर परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करत सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्यासाठी नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
या संपूर्ण दौऱ्यात नागरिकांनी स्वच्छता, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, अतिक्रमण आणि इतर नागरी सुविधांबाबत विविध समस्या मांडल्या. प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार आयुक्तांनी यावेळी केला.
शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त करण्यासाठी अशा प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यांची मालिका पुढेही सुरू राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.



