नागपुरात सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत

२५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हे शाखेची कारवाई; ७.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. सलग १५ दिवस २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्याची चैन, दुचाकी, कार आणि मोबाईल फोनसह एकूण ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माहितीनुसार, फिर्यादी पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० ग्रॅम वजनाची, अंदाजे १ लाख ९६ हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले होते. या घटनेनंतर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत दोन आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीची सोन्याची चैन, दोन मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि एक कार असा सुमारे ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, शहरातील साखळी चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागपूर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



