गुजरात महापुरातून ४० प्रवाशांची हेलिकॉप्टरद्वारे थरारक सुटका

वापीजवळ पुरात ट्रॅव्हल्स अडकल्यानंतर एनडीआरएफची यशस्वी बचाव मोहीम; मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील तिघेही सुरक्षित
मेहकर / वापी | प्रतिनिधी
गुजरातमधील वापीजवळ आलेल्या महापुरात अडकलेल्या ट्रॅव्हल्समधील ४० प्रवाशांची एनडीआरएफने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने थरारक बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. या प्रवाशांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ गावातील तीन नागरिकांचाही समावेश असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला.
माहितीनुसार, २२ जुलैच्या मध्यरात्री वापीहून नाशिकमार्गे जालन्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स वापीजवळील आंबेठी-कोपर्ली पुलावर अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकली. पाण्याचा वेग वाढत गेल्याने ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना वाहनाच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. रात्रभर मुसळधार पाऊस आणि वाढत्या पुराच्या पाण्यामुळे प्रवाशांवर मोठे संकट ओढवले होते.
घटनेची माहिती मिळताच गुजरात प्रशासन, एनडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. तसेच केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाशी समन्वय साधून बचावकार्याला गती दिली.
पहाट होताच एनडीआरएफच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या मदतीने टप्प्याटप्प्याने सर्व ४० प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. संपूर्ण बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
एनडीआरएफ, गुजरात प्रशासन आणि विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे वेळेत बचावकार्य पूर्ण होऊन सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या धाडसी आणि यशस्वी बचाव मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अडचणीच्या काळात दाखविलेल्या तत्परतेबद्दल बचाव पथकांचे अभिनंदन केले जात आहे.



