citynewsLatest NewsMaharashtraMumbaiWeather Report

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती

नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग; हवामान विभागाचा रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काही भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा घाटमाथा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला असून होळकर पुलाखालून सुमारे १६ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. गंगापूर धरणातून ३ हजार क्यूसेक तर दारणा धरणातून १५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुती मंदिराजवळ पुराचे पाणी छातीपर्यंत पोहोचल्याने प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नांदूर मध्यमेश्वर धरणातून २५ हजार क्यूसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येत आहे.

रामकुंड परिसरात रात्री अचानक पाण्याची पातळी वाढल्याने एक पर्यटक अडकला होता. अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथकाने रात्रभर विशेष मोहीम राबवून त्याची सुखरूप सुटका केली.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडक सागर धरण ओव्हरफ्लो झाले असून वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाशिकच्या कळवण तालुक्यात गिरणा नदीतून २२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदोचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

याशिवाय सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातील जलसाठाही वेगाने वाढत असून धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे, तसेच नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button