एडिफाय स्कूलजवळील शेतात 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला

घटनास्थळी तणनाशकाची बाटली; प्राथमिक स्तरावर आत्महत्येचा संशय, नांदगाव पेठ पोलिसांचा तपास सुरू
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती-चांदूर बाजार मार्गावरील एडिफाय स्कूलजवळील शेतात 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तणनाशक औषधाची बाटली आढळल्याने पोलिसांनी प्राथमिक स्तरावर आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नांदगाव पेठ पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
मृत तरुणाची ओळख शिवा खेडकर (वय 26) अशी झाली असून तो चांदूर बाजार तालुक्यातील परसोडा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेतात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. घटनास्थळी आढळलेल्या तणनाशकाच्या बाटलीच्या आधारे प्राथमिक स्तरावर आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असला, तरी पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.
प्राथमिक माहितीनुसार, शिवा खेडकर हा अहमदाबाद येथील बहिणीकडून अमरावतीतील दुसऱ्या बहिणीकडे आला होता. त्याने बहिणीच्या मोबाईलवरून एका मित्राला गावाकडे येत असल्याची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात आढळून आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हा प्रकार आत्महत्येचा आहे की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याचा तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत. पोलिसांकडून मृताच्या हालचाली, मोबाईलवरील संपर्क, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर शक्यतांचा तपास केला जात आहे.
दरम्यान, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.



