Amaravti GramincitynewsLatest NewsMaharashtrativsa

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ तिवसा शहरात कडकडीत बंद

जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय निषेध; नीट प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी

तिवसा | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गुरुवारी सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभाग घेत कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला.

सर्वपक्षीय आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने तिवसा शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिली. शहरातील विविध भागांत शांततेत बंद पाळण्यात आला.

पेट्रोल पंप चौकात आयोजित निषेध आंदोलनात विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध नोंदविला. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.

बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिवसा पोलिसांनी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले.

दरम्यान, तिवसा शहरातील सर्वपक्षीय बंद आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनामुळे नीट प्रकरणाविषयी जनभावना पुन्हा एकदा व्यक्त झाल्या आहेत. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले गेले असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button