Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraWardha

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू

वर्ध्यातील विरुळ शिवारातील दुर्घटना; पुण्यावरून परतणाऱ्या कुटुंबासह सहा जणांचा मृत्यू, बचावकार्य तातडीने सुरू

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील विरुळ शिवारात रविवारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथील एका कुटुंबातील तिघांचा समावेश असल्याचे सांगितले जात असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब पुण्यावरून आपल्या मूळ गावी परतत असताना हा अपघात घडला. कारमधील चार जणांचा तसेच मालवाहू आयशर वाहनातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

अपघातस्थळी यापूर्वी इथेनॉल वाहून नेणारा टँकर उलटल्याने परिस्थिती आधीच गंभीर होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक एका बाजूने टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्यात आली होती.

याचदरम्यान मागून आलेल्या मालवाहू आयशर वाहनाने कारला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना मदत, वाहतूक सुरळीत करणे तसेच अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

दरम्यान, उलटलेला इथेनॉल टँकर हटविण्याची प्रक्रियाही सुरू असून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

समृद्धी महामार्गावरील ही दुर्घटना पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करणारी ठरली आहे. या अपघातामुळे सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button