citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeYavatmal

मोहद्यात दोन सराफा दुकाने फोडून दीड कोटींहून अधिकचा ऐवज लंपास

पहाटे सहा चोरट्यांचा धाडसी डाव; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथके

यवतमाळ | प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत दोन सराफा दुकाने फोडून दीड कोटींहून अधिकचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण चोरीचा प्रकार दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास सहा चोरटे चेहऱ्यावर मास्क लावून मोहदा येथील राजेंद्र ज्वेलर्स आणि वर्मा ज्वेलर्स या सराफा दुकानांजवळ पोहोचले. त्यांनी दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास करून पसार झाले.

राजेंद्र ज्वेलर्समधून २८ किलो चांदी, ६५० ग्रॅम सोने आणि सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड, असा एकूण अंदाजे १ कोटी ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर वर्मा ज्वेलर्समधील नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नसून त्याचा पंचनामा आणि तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक तज्ज्ञ, श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. तसेच आरोपींचा माग काढण्यासाठी पाच विशेष तपास पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, चोरटे चोरीनंतर पुण्याच्या दिशेने पसार झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विविध जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधून आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

या धाडसी चोरीमुळे मोहदा परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सराफा व्यावसायिकांनी पोलिसांकडे रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची आणि बाजारपेठेतील सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button