AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचा संप; शहराच्या स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम

वेळेवर वेतन, पीएफ आणि इतर सुविधांअभावी आंदोलन; अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत सफाई कर्मचारी आणि वाहन चालकांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याचा, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ओव्हरटाईमचे मानधन आणि कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या संपामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होऊ लागला असून अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे.

अमरावती म्युनिसिपल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि वाहन चालकांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नियमित सेवा बजावूनही त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. तसेच गणवेश, गमबूट, सुरक्षा साहित्य, पीएफ, सरकारी सुट्ट्या आणि ओव्हरटाईमचे मानधन यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याने अखेर कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या संपाचा सर्वाधिक परिणाम झोन क्रमांक ३ मधील कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. अनेक कचरा वाहतूक वाहने बंद असल्याने शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलनकर्त्यांनी कचरा व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या कोणार्क कंपनीवर कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. कंपनीकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनात युनियनचे मुख्य सचिव सुनील घटाळे, अध्यक्ष नारायणराव चव्हाण, प्रमोद गायकवाड, राजेश चावरे यांच्यासह मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी आणि वाहन चालक सहभागी झाले आहेत. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या आरोपांवर संबंधित कंपनी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रशासन, महानगरपालिका, कंपनी आणि कामगार यांच्यात लवकरात लवकर तोडगा निघणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button