citynewsInternational NewsLatest News

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांच्या स्पीडबोटला अपघात; 15 जणांचा मृत्यू

फू कुओक बेटाजवळ भीषण दुर्घटना; बचावकार्य सुरू, अपघाताच्या कारणांचा तपास

व्हिएतनाम | प्रतिनिधी

व्हिएतनाममधील फू कुओक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या स्पीडबोटला झालेल्या भीषण अपघातात किमान १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामान, प्रचंड लाटा आणि जोरदार वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, व्हिएतनामी प्रशासनाकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.

माहितीनुसार, शनिवारी दुपारी फू कुओक बेटाजवळील होन मे रुट न्गोई (Hon May Rut Ngoai) बेटावरून पर्यटकांना घेऊन स्पीडबोट अन थोई (An Thoi) बंदराच्या दिशेने परतत होती. बोटीत ३२ भारतीय पर्यटक आणि चार व्हिएतनामी कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून अल्प अंतरावर असतानाच अचानक मोठ्या लाटा आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने बोट उलटली.

या दुर्घटनेत आतापर्यंत किमान १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर २१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच व्हिएतनामचे तटरक्षक दल, नौदल, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबविण्यात आली असून सर्व प्रवाशांचा शोध पूर्ण करण्यात आला आहे.

दरम्यान, व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने या दुर्घटनेची दखल घेत हनोई आणि हो ची मिन्ह सिटी येथे मदत कक्ष सुरू केले असून, बाधित कुटुंबांना आवश्यक मदत आणि माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.

या दुर्घटनेचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी व्हिएतनामी प्रशासनाने तपास सुरू केला असून बोटीच्या सुरक्षिततेसह हवामानाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button