पुरामुळे अंत्यसंस्कारांनाही अडथळा; महिलेचा मृतदेह दोन तास घराच्या छतावर ठेवावा लागला

पालघरच्या केळवेतील हृदयद्रावक घटना; पुराच्या पाण्यामुळे स्मशानभूमी जलमय, ग्रामस्थांच्या मदतीने अखेर अंत्यसंस्कार
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील सफाळा परिसरातील केळवे गावात मुसळधार पावसामुळे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. घरात पुराचे पाणी शिरल्याने आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यामुळे एका महिलेचा मृतदेह तब्बल दोन तास घराच्या छतावर ठेवण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
माहितीनुसार, केळवे येथील देवी पाड्यात राहणाऱ्या अनुसया लिलकाया (वय ५५) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
दुसऱ्या दिवशी रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, मुसळधार पावसामुळे गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे नातेवाईकांना गुडघाभर पाण्यातून मृतदेह खांद्यावर घेऊन घरापर्यंत आणावा लागला.
यानंतर गावातील स्मशानभूमीही पुराच्या पाण्याखाली गेल्याने अंत्यसंस्कार करणे शक्य झाले नाही. त्याचवेळी घरातही पाणी शिरू लागल्याने मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबीयांनी घराच्या छतावरील सिमेंटची पत्रे काढून मृतदेह छतावर ठेवला आणि पावसापासून संरक्षणासाठी प्लास्टिकने झाकून ठेवले. तब्बल दोन तास कुटुंबीय मृतदेहाजवळ छतावर थांबून राहिले.
पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली आणण्यात आला आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे पुरग्रस्त भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि आपत्कालीन व्यवस्थेतील मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.



