रिसोड कोठडी मृत्यू प्रकरणात 9 पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेप

15 वर्षांच्या न्यायालयीन सुनावणीनंतर वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
वाशिम | प्रतिनिधी
रिसोड पोलीस ठाण्यात 2011 मध्ये घडलेल्या कोठडी मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षे न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हा निकाल देण्यात आला असून, राज्यभरात या निर्णयाची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा गावातील पारधी समाजातील बेग्या पवार यांना 9 मे 2011 रोजी चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र अटकेनंतर अवघ्या एका दिवसात, 10 मे 2011 रोजी पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची गंभीर दखल घेत गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीने 34 दिवस तपास करून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. सुमारे 15 वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी निकाल देत तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव धांडे यांच्यासह एकूण नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालानंतर कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांबाबत न्यायव्यवस्थेने कठोर भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले असून, हा न्यायासाठीच्या दीर्घ लढ्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली.



