राज्यात पुन्हा सक्रिय झाला मान्सून; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मॅडन-जुलियन ऑसिलेशन (MJO) सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलैच्या सुरुवातीलाच मान्सूनने पुन्हा जोर धरल्याने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोकण, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागांत पावसाची नोंद होत असून पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
आज ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
हवामान विभागाने कोल्हापूर घाट विभाग, सातारा घाट विभाग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज येलो अलर्ट असलेले जिल्हे
सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदी-नाले, धबधबे, घाट रस्ते आणि सखल भागांमध्ये अनावश्यक वावर टाळण्याचा तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतीची कामे, प्रवास आणि दैनंदिन हालचाली करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



