माजलगाव नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचा फटका; उघड्या नाल्यात पडून शाळकरी मुलगी गंभीर जखमी

डोळ्याजवळ पाच टाके; अर्धवट नाला आणि सुरक्षेचा अभाव असल्याचा नागरिकांचा आरोप
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बँक कॉलनी परिसरात नगरपरिषदेच्या कथित निष्काळजीपणामुळे एक शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अर्धवट अवस्थेत सोडण्यात आलेल्या उघड्या नाल्यात पडल्याने मुलीच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून तिला पाच टाके घालावे लागले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्ती पोटभरे ही शाळकरी मुलगी शाळेतून घरी परतत असताना रस्त्यालगत सुरू असलेल्या अर्धवट नाल्याच्या कामामुळे उघड्या राहिलेल्या नाल्यात पडली. या अपघातात तिच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या डोळ्याजवळ पाच टाके घातले असून उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिनाभरापासून नाल्याचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे. नाल्याभोवती कोणतेही संरक्षण कठडे, इशारा फलक किंवा अन्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
जखमी मुलीचे आजोबा अश्रूबा पोटभरे यांनी सांगितले की, या धोकादायक नाल्याबाबत अनेक वेळा नगरपरिषदेला सूचना करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या उघड्या नाल्यात पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने नाल्याचे काम पूर्ण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.



