AMCActionAmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत अग्निसुरक्षा तपासणी मोहीम; गर्दीच्या इमारतींचे १५ दिवसांत सर्वेक्षण

महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक; फायर एनओसी, आपत्कालीन मार्ग व सुरक्षा यंत्रणेची होणार तपासणी

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील अग्निसुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील गर्दीच्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १५ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस, रुग्णालये, मॉल, हॉटेल, बाजारपेठा, मंगल कार्यालये तसेच इतर गर्दीच्या इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला.

बैठकीत प्रत्येक इमारतीत अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे का, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध आहेत का, फायर एनओसी घेण्यात आली आहे का, तसेच अग्निशमन यंत्रांची नियमित तपासणी केली जाते का, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी अग्निशमन विभाग, नगररचना विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने शहरातील सर्व गर्दीच्या इमारतींचे सर्वेक्षण करून १५ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय, शहरासाठी स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करण्यात येणार असून त्यामध्ये अग्निसुरक्षेची किमान मानके, मॉक ड्रिल, आपत्कालीन स्थलांतर प्रक्रिया, संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि नियमित तपासणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे.

सर्वेक्षणादरम्यान ज्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेतील गंभीर त्रुटी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच इमारत मालकांनी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, अग्निसुरक्षेच्या प्रश्नावर माध्यमांमधून सातत्याने लक्ष वेधण्यात आल्यानंतर प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेतल्याची चर्चा शहरात होत असून, आता सर्वांचे लक्ष १५ दिवसांनंतर सादर होणाऱ्या सर्वेक्षण अहवालाकडे आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button