citynewsLatest NewsMaharashtraNanded

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे; आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

माहूर तालुक्यातील अंजनखेडा येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे निदर्शने; काही काळ तणावाचे वातावरण

नांदेड | प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. अंजनखेडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान अंजनखेडा येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच “गद्दार” असे मजकूर असलेले फलक आणि पोस्टर्सही झळकविण्यात आले.

या दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार नागेश पाटील आष्टीकर हेही उपस्थित होते. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.

या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button