citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात पहाटे दोन ठिकाणी सापांचे यशस्वी रेस्क्यू

बाथरूमच्या जाळीत अडकलेला आणि झाडावर बसलेला साप सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात मंगळवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी साप आढळल्याच्या घटना घडल्या. बेसा आणि दिघोरी परिसरात सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दोन्ही सापांचे सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. या कारवाईमुळे सापांचे प्राण वाचले तसेच परिसरातील नागरिकांनाही संभाव्य धोका टळला.

पहिली घटना बेसा परिसरातील रचना वाटिका सोसायटीमध्ये घडली. येथील रहिवासी वैभव चकोले हे पहाटे ब्रश करत असताना त्यांना बाथरूममधून आवाज ऐकू आला. पाहणी केली असता सुमारे चार फूट लांबीचा बिनविषारी तस्कर जातीचा साप बाथरूमच्या जाळीत अडकून तडफडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र शुभम पराडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या संयमाने जाळीवर खोबरेल तेलाचा वापर करून सापाला कोणतीही इजा न होऊ देता सुरक्षित बाहेर काढले. किरकोळ जखमांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सापाला मटकाजरी जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

दुसरी घटना दिघोरी येथील फडणीस नगर परिसरात घडली. पहाटे घराबाहेर फेरफटका मारत असताना एका महिलेला अंगणातील झाडावर मोठा साप बसलेला दिसला. यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र शुभम पराडे यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या शुभम पराडे यांनी झाडावरील साप सुरक्षितपणे खाली उतरवून त्याला पकडले. त्यानंतर त्या सापालाही मटकाजरी जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, साप आढळल्यास घाबरून जाऊ नये किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर राखून तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरणातील अन्नसाखळीचा साप हा महत्त्वाचा घटक असून, योग्य वेळी प्रशिक्षित व्यक्तींकडून केलेले रेस्क्यू मानव आणि वन्यजीव दोघांच्याही संरक्षणासाठी महत्त्वाचे ठरते, असेही सर्पमित्रांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button