केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासाला वेग; आरोपी चेतन चौधरीकडून लोहगडावर सीन रिक्रिएशन

सिया गोयलनंतर सहआरोपीची घटनास्थळी पुनर्रचना; जबाबांतील विसंगतींची पडताळणी सुरू
पुणे | प्रतिनिधी
राज्यात गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्य आरोपी सिया गोयलनंतर सहआरोपी चेतन चौधरी यालाही लोहगड येथे नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना (सीन रिक्रिएशन) करण्यात आली. तपासादरम्यान हत्येच्या दिवशी परिधान केलेला हुडी, कानटोपी आणि चेहऱ्यावर मास्क असा तोच पेहराव करून पोलिसांनी घटनाक्रमाची पडताळणी केली.
यापूर्वी पोलिसांनी सिया गोयलला घटनास्थळी नेऊन तपासाची पुनर्रचना केली होती. त्यानंतर आता चेतन चौधरीकडूनही घटनास्थळी नेमका घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तपासादरम्यान चेतन चौधरी लोहगडावर कसा पोहोचला, सिया गोयलने त्याला कोणते इशारे केले, केतन अग्रवाल यांना एकांतस्थळी कसे नेण्यात आले आणि त्यानंतर नेमके काय घडले, याबाबत पोलिसांनी सविस्तर पडताळणी केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या जबाबांमध्ये अनेक मुद्द्यांवर विसंगती आढळून आली आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत असल्याने केतन अग्रवाल यांना नेमका धक्का कोणी दिला, हा तपासातील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.
घटनास्थळी करण्यात आलेल्या पुनर्रचनेदरम्यान पोलिसांनी तांत्रिक तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांची पडताळणी केली. या प्रक्रियेत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असली, तरी याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
दरम्यान, तपास यंत्रणा फॉरेन्सिक पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि दोन्ही आरोपींचे जबाब यांची सांगड घालत संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून अधिकृत निष्कर्षानंतरच हत्येमागील नेमकी भूमिका आणि घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.



