citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

रॅपिडो चालकाचा व्हिडिओ व्हायरल; एफआयआरबाबतच्या आरोपांवर पोलिसांचे स्पष्टीकरण

नंदनवन पोलीस ठाण्याबाहेरील प्रकरण; संबंधिताविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

नागपूर | प्रतिनिधी

नागपुरात एका रॅपिडो चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नंदनवन पोलिसांनी या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित चालकाने पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेतला जात नसल्याचा आरोप करत स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याचे वक्तव्य केले होते. या व्हिडिओनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याबाहेर एका रॅपिडो चालकाने व्हिडिओ चित्रित करून पोलिसांवर एफआयआर नोंदवून घेत नसल्याचा आरोप केला. चालकाच्या म्हणण्यानुसार, काही ऑटोचालकांनी त्याच्यावर मारहाण केली होती. मात्र, एफआयआर दाखल करण्याऐवजी केवळ अदखलपात्र (एनसी) तक्रारीची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्याने केला.

याच व्हिडिओमध्ये संबंधित चालकाने स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र किंवा इतर साधन जवळ बाळगण्याचा इशाराही दिला. तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी पोलिसांवर असेल, असेही त्याने म्हटले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नंदनवन पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीची तक्रार अदखलपात्र स्वरूपाची असल्याने त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तक्रार नोंदवून त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितल्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी पुढे सांगितले की, व्हायरल व्हिडिओची दखल घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२६ अंतर्गत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एफआयआर, अदखलपात्र तक्रार (एनसी) आणि तक्रार नोंदणीच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कोणत्याही नागरिकाची तक्रार नाकारली जात नसून कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करूनच तक्रारींची नोंद केली जाते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button