citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeWashim

वाशिममध्ये दुकानफोडी करणारा सराईत चोर जेरबंद; तीन वर्षांतील सात गुन्ह्यांची कबुली

दिवसा दुकानांची रेकी, रात्री घोंगडी घेऊन फोडत होता दुकाने; चोरीचा मुद्देमाल आणि हत्यारे जप्त

वाशिम | प्रतिनिधी

वाशिम शहरात सलग दुकानफोड्या करून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत चोराला अखेर वाशिम शहर पोलिसांनी अटक केली आहे. दिवसा बंद दुकानांची रेकी करून रात्री अंगावर घोंगडी घेऊन ओळख लपवत चोरी करणाऱ्या या आरोपीने गेल्या तीन वर्षांतील सात दुकानफोड्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि दुकानफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव खेत्राजी माणिक पवार (वय ५२, रा. खरबी, जि. हिंगोली) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दिवसा शहरातील विविध भागात फिरून बंद दुकानांची पाहणी करत होता. त्यानंतर रात्री अंगावर घोंगडी घेऊन चेहरा आणि ओळख लपवत तो दुकानांचे कुलूप तोडून चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वाशिम शहर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम, लोखंडी रॉड, पेचकस, कुलूप तोडण्यासाठी वापरली जाणारी विविध हत्यारे, बॅटरी, टोपी, स्कार्फ तसेच चोरीच्या वेळी वापरलेली घोंगडी जप्त करण्यात आली आहे.

तपासादरम्यान आरोपीने वाशिम शहरातील पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लव्हाळा परिसरात गेल्या तीन वर्षांत एकूण सात दुकानफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या दुकानफोडी प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यांचा शोध सुरू आहे. सराईत आरोपीला अटक झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले, तरी या चोरीच्या साखळीतील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविली आहे.

या कारवाईमुळे वाशिम शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, प्रलंबित घरफोडी व दुकानफोडीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button