मुसळधार पावसाने मनपाच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल; चौधरी चौकात नाला ओव्हरफ्लो, दुकानदारांचे नुकसान

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. खापर्डे बगीचा आणि मालवीय चौक परिसरातून येणारा नाला चौधरी चौकात ओव्हरफ्लो झाल्याने घाणयुक्त पाणी रस्त्यांवर आणि दुकानांमध्ये शिरले. परिणामी नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच सिटी न्यूजने शहरातील नाल्यांच्या दुरवस्थेबाबत इशारा दिला होता आणि पहिल्याच जोरदार पावसात तो इशारा खरा ठरल्याचे चित्र समोर आले आहे.
बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर खापर्डे बगीचा आणि मालवीय चौक परिसरातील नाल्यात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ आणि कचरा पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरला. त्यामुळे चौधरी चौक परिसरात नाला ओव्हरफ्लो झाला आणि घाणयुक्त पाणी थेट रस्त्यांवर आले.
या पाण्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
दरम्यान, परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन रात्री महापौर आणि महापालिका आयुक्त वर्षा लड्ढा यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह पंचमुखी मंदिर परिसराची पाहणी केली. अंधारामुळे सविस्तर निरीक्षण करणे शक्य झाले नसल्याने गुरुवारी सकाळी आयुक्तांनी पुन्हा घटनास्थळी भेट दिली.
यावेळी मुरके हॉस्पिटल परिसरासह विविध भागांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर सफाई यंत्रणेला तातडीने कामाला लावत नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात सहायक आयुक्त भूषण पुसदकर, शहर अभियंता पवार, स्वीकृत नगरसेवक अॅड. प्रशांत देशपांडे आणि आरोग्य अधिकारी डॉ. अजय जाधव उपस्थित होते.
मात्र नागरिकांचा प्रश्न कायम आहे — जर पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे प्रभावीपणे झाली असती, तर चौधरी चौकात अशी परिस्थिती निर्माण झाली असती का?
पावसाळ्याची सुरुवात होताच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी मोठ्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी महापालिका प्रशासनाने नालेसफाई, पाणी निचरा आणि पावसाळी नियोजनाबाबत प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



