भरदिवसा ज्वेलर्स दुकानात लुटीचा प्रयत्न फसला; नागरिकांच्या सतर्कतेने आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका ज्वेलर्स दुकानात घुसून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा डाव उधळला गेला असून त्याला पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर परिसरातील बिच्छू टेकडी येथे असलेल्या माँ वैष्णवी ज्वेलर्स या दुकानात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक युवक ग्राहकाच्या वेशात दुकानात दाखल झाला. सुरुवातीला त्याने दुकानातील कर्मचाऱ्यांशी साधी चर्चा केली. त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही.
मात्र काही वेळातच आरोपीने अचानक कर्मचाऱ्याला धमकावून भीतीचे वातावरण निर्माण केले आणि ज्वेलरी काऊंटर उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर काऊंटरमधील सोन्या-चांदीचे दागिने बॅगेत भरून तो पसार होण्याच्या तयारीत होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील व्यापारी आणि नागरिक तत्काळ सक्रिय झाले. त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
या संपूर्ण घटनेचे दृश्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपीची चौकशी सुरू असून त्यामागे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
भरदिवसा ज्वेलर्स दुकानात लुटीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, आरोपी एकटाच होता की त्यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचा सखोल तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत.



