परळीत विषारी हातभट्टी दारूचा बळी! तरुणाचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

‘दारूबंदी करा, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यात आणू’; दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील परळी शहरात विषारी हातभट्टी दारूमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून संतप्त नातेवाईकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दारू विक्रेत्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पुण्यात विषारी दारूमुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परळीमध्येही अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील साठे नगर परिसरातील एका तरुणाने हातभट्टीची दारू सेवन केली होती. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विषारी दारूमुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. “दारूबंदी करा अथवा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवू,” असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला.
नातेवाईकांनी आरोप केला की, साठे नगर परिसरात हातभट्टी दारूची विक्री अनेक वर्षांपासून सुरू असून याबाबत वारंवार निवेदने, तक्रारी आणि मोर्चे काढूनही पोलिसांनी प्रभावी कारवाई केली नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा पोलिसांना माहिती देऊनही अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच आज एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणात संबंधित विक्रेत्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच धर्तीवर परळीतील या प्रकरणातही संबंधित दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईक आणि नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती आणि मृत्यूचे नेमके कारण तपासले जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि रासायनिक विश्लेषणाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
परळीतील या घटनेमुळे अवैध हातभट्टी दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी दारूबंदी आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.



