citynewsLatest NewsMaharashtraNanded

मालवाडा शिवारात अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; माहूर परिसरात खळबळ

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी दुपारच्या सुमारास मालवाडा शिवारातील माळरान भागात हा मृतदेह आढळून आला. गावाच्या पूर्वेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी मृतदेह अनेक दिवसांपासून पडून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.

या घटनेची माहिती मालवाडा गावचे पोलीस पाटील शरद नथ्थुजी बेहरे यांनी माहूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर माहूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १७/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत व्यक्ती कोण आहे, तो या परिसरात कसा आला, तसेच मृत्यूची वेळ आणि कारण काय, याचा शोध घेण्यासाठी विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके करत असून, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, अज्ञात मृतदेह आढळल्याच्या घटनेमुळे मालवाडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटवून या घटनेमागील सत्य समोर आणण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button