हार घालून दिला सुरक्षिततेचा संदेश! दत्तापूर पोलिसांची हेल्मेट जनजागृती मोहीम चर्चेत

विना हेल्मेट चालकांचा अनोखा सत्कार; ‘दंड नव्हे, सुरक्षितता महत्त्वाची’ असा पोलिसांचा संदेश
धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी
रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. दत्तापूर पोलिसांनी यासाठी एक अनोखी जनजागृती मोहीम हाती घेतली असून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांचा हार घालून सत्कार करत त्यांना सुरक्षिततेचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण होताना दिसत आहे.
अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार २२ जूनपासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी दत्तापूर पोलिसांनी विशेष जनजागृती व कारवाई मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांचा हार घालून अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि भविष्यात नियमित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलिसांनी स्पष्ट केले की, दुचाकी चालकासोबतच मागील आसनावर बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
दत्तापूर पोलिसांनी विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर विशेष बंदोबस्त तैनात केला असून विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे.
या मोहिमेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वाहतूक पोलीस हवालदार रवी पाखरे, नारायण फड, मयूर धवस, धीरज इंगळे तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी नागरिकांना वाहतूक सुरक्षिततेचे धडे दिले.
“हेल्मेट हा केवळ दंड टाळण्याचा उपाय नसून अपघाताच्या वेळी जीव वाचविणारे प्रभावी सुरक्षा कवच आहे,” असा महत्त्वपूर्ण संदेश पोलिस प्रशासनाने दिला.
“हेल्मेट ही सक्ती नसून सुरक्षिततेची गरज आहे. आपला जीव अमूल्य आहे आणि त्याच्या रक्षणासाठी हेल्मेटचा वापर अत्यावश्यक आहे,” असे आवाहन दत्तापूर पोलिसांनी नागरिकांना केले.
दत्तापूर पोलिसांच्या या अभिनव जनजागृती मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जनतेत जागरूकता वाढताना दिसत आहे. सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर करा आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा.



