AMCActionAmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

दस्तुरनगर परिसरात मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कारवाई

लाखोंची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा; कर भरण्याचे प्रशासनाचे आवाहन

अमरावती प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिका पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तुरनगर परिसरात मालमत्ता कराच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा बजावून तातडीने कर भरण्याचे निर्देश देण्यात आले.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक ८ मधील मालमत्ता क्रमांक ११४ चे धारक रविराज हिम्मतराव देशमुख यांच्या विद्यापीठ कॉलनी, एमआयडीसी रोड येथील पेट्रोल पंपाकडे सुमारे ९ लाख रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे. त्यामुळे संबंधित मालमत्तेला जप्ती नोटीस बजावण्यात आली.

तसेच मालमत्ता क्रमांक ९३८ चे धारक तथा ‘किचन ३६५’चे संचालक महेश पहुमल छाबडा यांच्याकडेही सुमारे ९ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे आढळून आले. त्यांनाही महानगरपालिकेकडून जप्तीची नोटीस देण्यात आली आहे.

याशिवाय एमआयडीसी परिसरातील मालमत्ता क्रमांक २२५५-३ चे धारक जाधव ग्रुप यांच्याकडे ५ लाख ५५ हजार रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असल्याने संबंधित मालमत्तेवरही जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली असून नोटीस बजावण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या महसूल विभागाकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई केली जात आहे. थकबाकीदारांनी तात्काळ कराचा भरणा करून पुढील जप्ती व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ही कारवाई पूर्व झोन क्रमांक ३ चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी शेखर सोनकांबळे, वसुली लिपीक दीपक सरसे, राज डेंडुले तसेच भागिरथ खैरकर उपस्थित होते.

महानगरपालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, थकबाकीची रक्कम त्वरित जमा न केल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button