AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

सिटी न्यूज इम्पॅक्ट : वृत्ताची दखल घेत आयुक्त वर्षा लड्डा यांची राजापेठ-बेलपुरा परिसराला भेट

सिटी न्यूजच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन सक्रिय; पाणी निचरा, गटार स्वच्छता आणि झाडे हटविण्याचे तातडीचे आदेश

अमरावती | प्रतिनिधी

सिटी न्यूजने नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. काल प्रक्षेपित करण्यात आलेल्या वृत्तानंतर आज अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी राजापेठ आणि बेलपुरा परिसराला प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली होती, तर ठिकठिकाणी फांद्या कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. या समस्यांकडे सिटी न्यूजने सातत्याने लक्ष वेधत प्रशासनापर्यंत नागरिकांचा आवाज पोहोचवला होता.

या वृत्ताची दखल घेत आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज राजापेठ परिसरातील भुयारी गटारांची पाहणी केली. पावसाचे पाणी जलदगतीने वाहून जाण्यासाठी निचरा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच गटारांची नियमित स्वच्छता आणि नाल्यांची देखभाल करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या.

यानंतर बेलपुरा परिसरात भेट देऊन वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या झाडांची आणि फांद्यांची पाहणी करण्यात आली. रस्त्यांवरील अडथळे तातडीने दूर करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यावरही त्यांनी भर दिला.

सिटी न्यूजच्या सातत्यपूर्ण आणि जनहिताच्या पत्रकारितेमुळे प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सिटी न्यूजने उचललेला आवाज पुन्हा एकदा प्रभावी ठरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button