महिनाभर बेपत्ता असलेल्या वृद्धाचा जंगलात सांगाडा आढळला

रामटेक तालुक्यातील धक्कादायक घटना; शोधमोहीम आणि वनविभागाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
रामटेक प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या एका ६३ वर्षीय वृद्धाचा मानवी सांगाडा जंगलात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलीस आणि वनविभागाकडून संयुक्तपणे शोधमोहीम राबविण्यात आली होती. मात्र तरीही तब्बल एक महिन्यानंतर सांगाडा सापडल्याने शोधकार्य आणि वनविभागाच्या गस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील करवाही परिसरातील दुलारा गावचे रहिवासी गोपीचंद भैय्यालाल खंडाते (वय ६३) हे १२ मे रोजी घरातून जंगलाच्या दिशेने गेले होते. मात्र ते त्यानंतर घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर देवलापार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आणि वनविभागाच्या पथकांनी संयुक्तपणे जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. मात्र या मोहिमेला यश आले नव्हते. दरम्यान शनिवारी देवलापार वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४७४ मध्ये एका गुराख्याला मानवी सांगाडा आढळून आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हा सांगाडा बेपत्ता असलेल्या गोपीचंद खंडाते यांचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अधिकृत ओळख आणि पुष्टीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मृत्यूनंतर वन्य प्राण्यांनी मृतदेहाची विटंबना केल्याची शक्यता तपासली जात आहे. सांगाडा पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जंगलात नियमित गस्त आणि शोधमोहीम सुरू असल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात येत असताना हा सांगाडा इतके दिवस नजरेस कसा पडला नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शोधकार्य आणि गस्त व्यवस्थेतील संभाव्य त्रुटींवरही चर्चा सुरू झाली आहे.
महिनाभर बेपत्ता असलेल्या वृद्धाचा जंगलात सांगाडा सापडल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. मृत्यूचे नेमके कारण काय, शोधमोहीमेत कोणत्या त्रुटी राहिल्या आणि वनविभागाच्या गस्तीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना प्रशासन काय उत्तर देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



