प्रेमसंबंधाच्या वादातून युवकाची हत्या; नागपुरातील संघर्ष नगर परिसर हादरला, मुख्य आरोपी फरार

नागपूर : नागपूर शहर पुन्हा एकदा खुनाच्या थरारक घटनेने हादरले आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष नगर परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान अशफाक अन्सारी असे मृत युवकाचे नाव आहे. सलमानचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली असून याच कारणावरून स्थानिक युवक मुजम्मिल याच्यासोबत त्याचा काही दिवसांपासून वाद सुरू होता.
मंगळवारी मध्यरात्री संघर्ष नगर येथील टिपू सुलतान चौकातील एका पानटपरीजवळ दोघेही समोरासमोर आले. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र काही वेळातच वादाने हिंसक स्वरूप धारण केले.
आरोपी मुजम्मिलने सलमानवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सलमान गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सलमानला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर आरोपी मुजम्मिल घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. यशोधरा नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
खुनाच्या या घटनेनंतर संघर्ष नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून घडलेल्या या हत्येमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली असून फरार आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.



