भंडाऱ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ! शिवनीबांध गावात दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध गावातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गावातील नागरिकांना पाण्याऐवजी विषासमान दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. भर उन्हाळ्यात गावातील अनेक हातपंप बंद पडले असून सुरू असलेल्या हातपंपांमधूनही गंजयुक्त आणि गढूळ पाणी येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनीबांध गावात सध्या पाण्यासाठी अक्षरशः हाहाकार माजला आहे. गावातील अनेक हातपंप बंद अवस्थेत आहेत, तर सुरू असलेल्या हातपंपांमधून गंजयुक्त आणि दूषित पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास हातपंपाजवळ थांबावे लागत आहे. मात्र एवढी प्रतीक्षा करूनही मिळणारे पाणी पूर्णपणे गढूळ आणि आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हातपंपातील जुने आणि गंजलेले लोखंडी पाईप अनेक दिवसांपासून बदलण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पाण्यामध्ये गंजाचे कण स्पष्टपणे दिसत आहेत. दूषित पाणी पिल्यामुळे अनेक नागरिकांना घशात खवखव, पोटदुखी, उलट्या आणि इतर आजारांचा त्रास होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
एकीकडे गावात तीव्र पाणीटंचाई आहे आणि दुसरीकडे मिळणारे पाणीही विषासमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शिवनीबांध गावातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक मानली जात आहे. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार असताना दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तातडीने या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि गावकऱ्यांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



