एफडीएची भेसळविरोधी धडक मोहीम; मुंबईत डेरी, दूध विक्रेत्यांवर कारवाई

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार तपासणी; नियमभंग आढळलेल्या आस्थापनांवर कठोर कारवाई
मुंबई | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळविरोधी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये डेरी, दूध विक्रेते आणि कथित भेसळीच्या साखळीवर मोठी कारवाई करण्यात आली असून अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
एफडीएच्या माहितीनुसार, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मरीन लाईन्स परिसरातील पारसी डेरी फार्म येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान परिसरात अस्वच्छता, उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची अयोग्य साठवणूक, आवश्यक स्वच्छता सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी उपलब्ध नसणे तसेच पॅकेजिंगवरील आवश्यक माहितीत त्रुटी आढळल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या निरीक्षणांच्या आधारे संबंधित डेरीचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
यानंतर गोरेगाव परिसरात दुधाच्या पिशव्यांमध्ये कथित छेडछाड करून विक्री करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून शेकडो दुधाच्या पिशव्या जप्त करून त्यातील दूध नियमानुसार नष्ट करण्यात आले.
तसेच गोवंडी परिसरात एका डेरीवर छापा टाकून नियमांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवण्यात आलेले मोठ्या प्रमाणातील दूध जप्त करण्यात आले. जप्त केलेले दूध अन्नसुरक्षा नियमांनुसार नष्ट करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली.
एफडीएच्या सलग कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर बाजारात शुद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ झाल्याचेही काही व्यापाऱ्यांनी नमूद केले आहे.
काही व्यावसायिकांच्या मते, शुद्ध पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी या कारवायांचा दीर्घकालीन फायदा प्रामाणिक दूध उत्पादक, शेतकरी आणि ग्राहकांना होऊ शकतो.
राज्यभर सुरू असलेल्या या विशेष मोहिमेमुळे अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जात असून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत एफडीएने दिले आहेत.



