भारताच्या अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक झेप; पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’ यशस्वी

स्कायरूट एरोस्पेसची कामगिरी; सहा पेलोड यशस्वीरीत्या कक्षेत, खासगी अंतराळ क्षेत्रासाठी नवे पर्व
नवी दिल्ली / श्रीहरिकोटा | प्रतिनिधी
भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशातील पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’ चे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या या रॉकेटने पृथ्वीच्या निचल्या कक्षेत सहा पेलोड यशस्वीरीत्या स्थापित करत भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.
‘मिशन आगमन’ अंतर्गत पार पडलेल्या या मोहिमेत विक्रम-1 ने नियोजित उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली. या यशामुळे भारतीय खासगी अंतराळ उद्योगाच्या क्षमतेवर पुन्हा एकदा जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सुमारे २४ मीटर लांबीचे ‘विक्रम-1’ हे रॉकेट भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ नामकरण करण्यात आले आहे. कार्बन कॉम्पोझिट तंत्रज्ञानामुळे हे रॉकेट अधिक हलके, मजबूत आणि कार्यक्षम बनविण्यात आले आहे.
या रॉकेटमध्ये तीन सॉलिड प्रोपल्शन स्टेज तसेच अत्याधुनिक ऑर्बिटल अॅडजस्टमेंट मॉड्यूल बसविण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच मोहिमेत अनेक उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये अचूकपणे स्थापित करणे शक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यातील व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. त्यांनी या यशाला “भारताच्या नव्या अंतराळ युगाची सुरुवात” असे संबोधत देशातील खासगी उद्योगांच्या वाढत्या योगदानाचे कौतुक केले.
या मोहिमेच्या यशामुळे भारतीय खासगी कंपन्यांसाठी जागतिक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण बाजारात नवीन संधी निर्माण होणार असून, भारताचे अंतराळ क्षेत्र अधिक स्पर्धात्मक आणि सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.
‘विक्रम-1’च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताने अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. इस्रोच्या यशस्वी वाटचालीनंतर आता भारतीय खासगी कंपन्याही जागतिक अंतराळ उद्योगात आपली ठोस छाप उमटवत असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित झाले आहे.



