पावसासाठी वाशिममध्ये ‘धोंडी’; युवकांनी वरुणराजाला घातले साकडे

पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत; भरघोस पावसासाठी पारंपरिक लोकपरंपरेचा आधार
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पिकांवर संकटाचे ढग दाटले आहेत. आधीच बोगस बियाण्यांमुळे आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता पावसाअभावी आणखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे युवकांनी पारंपरिक ‘धोंडी’ काढत भरघोस पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी खरिपाची पिके उभी असली तरी गेल्या पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून लवकर पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यंदा बोगस बियाण्यांच्या समस्येमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील युवकांनी पारंपरिक पद्धतीने धोंडी काढली. कमरेला कडूलिंबाची पाने बांधून युवकांनी शहरातून फेरफटका मारत “धोंडी धोंडी पाणी दे” असा जयघोष केला. लोकपरंपरेनुसार अशा धार्मिक व सांस्कृतिक विधीद्वारे वरुणराजाला साकडे घातल्यास पाऊस पडतो, अशी श्रद्धा असल्याने युवकांनी भरघोस पावसासाठी प्रार्थना केली.
या वेळी शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, खरिपाची पिके वाचावीत आणि जिल्ह्यात लवकरात लवकर समाधानकारक पाऊस व्हावा, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
सध्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास खरिपाच्या पिकांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही पावसाबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



