AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत मनपा आयुक्तांची धडक पाहणी; स्वच्छता, अतिक्रमण व नागरिक सुविधांवर भर

झोन क्रमांक दोनमधील विविध भागांची प्रत्यक्ष तपासणी; नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईसह हरित क्षेत्र वाढविण्याचे निर्देश

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक दोनमधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत स्वच्छता, अतिक्रमण, नाल्यांची स्थिती, उद्यानांची देखभाल आणि नागरिक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

पाहणीची सुरुवात गर्ल्स हायस्कूल चौकातून करण्यात आली. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून परिसराची पाहणी करण्यात आली.

यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर आणि मालवीय चौकातील नाल्याची तपासणी करण्यात आली. नाल्यात कचरा टाकणाऱ्या हॉकर्सविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच नाल्यांची नियमित साफसफाई करून पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यावर भर देण्याचे सांगितले.

जयस्तंभ चौक आणि चौधरी चौक परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण आणि घुमंतूंशी संबंधित प्रश्नांची पाहणी करण्यात आली. साचलेला कचरा तातडीने हटविणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि नियमानुसार आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राजकमल चौक परिसर अधिक स्वच्छ, आकर्षक आणि सुशोभित करण्यासाठी विशेष नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले.

अंबादेवी परिसरातील अंबा नाल्याची पाहणी करत नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा नागरिकांच्या हितासाठी अधिक प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.

प्रशांत नगर उद्यानातील विविध समस्या जाणून घेत त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच नेहरू मैदान परिसरात स्वच्छता राखणे, घुमंतूंविषयी नियमानुसार कार्यवाही करणे आणि परिसर अधिक सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी महानगरपालिकेच्या नर्सरीलाही भेट देत उपलब्ध रोपे, वृक्षसंवर्धन आणि आगामी वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

पाहणीदरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींनी झोन क्रमांक दोनमधील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविल्या जातील, अशी ग्वाही डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

मनपा प्रशासनाच्या या धडक पाहणीमुळे शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, नाल्यांची देखभाल, उद्यानांचे सुशोभीकरण आणि हरित क्षेत्र वाढविण्याच्या कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button