धामणगाव रेल्वे तालुक्यात बस स्थानकावर इसमाचा मृतदेह आढळला; उष्माघातामुळे मृत्यूचा प्राथमिक अंदाज

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर बस स्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानकावर रात्री झोपलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका इसमाचा सकाळी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगरूळ दस्तगीर बस स्थानक परिसरात चंद्रशेखर कुडमते वय अंदाजे 50 वर्षे, रा. दिघी होणाडे, यांचा मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते मानसिक रुग्ण असल्याचे समजते.
रात्रीच्या वेळी ते बस स्थानक परिसरात झोपले होते. मात्र सकाळी ते निष्प्राण अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगीर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमका मृत्यू कशामुळे झाला हे पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मंगरूळ दस्तगीर बस स्थानकावर घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एकाकी अवस्थेत झालेला हा मृत्यू अनेक प्रश्न निर्माण करून गेला असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. अधिक माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणातील सत्य स्पष्ट होणार आहे.



