AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

जे अँड डी मॉलच्या दुरावस्थेची मनपाकडून पाहणी; बिल्डरला दुरुस्तीचे आदेश

व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल; वेळेत काम न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील जे अँड डी मॉलमधील दुरावस्था आणि व्यापाऱ्यांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींची अखेर महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. आमदार रवी राणा यांच्या निर्देशानुसार उपमहापौर सचिन भेंडे आणि गटनेते नाना आमले यांनी मनपा अधिकाऱ्यांसह मॉलची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत मॉलमधील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने बिल्डरला तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जे अँड डी मॉलमधील व्यापाऱ्यांनी पार्किंग, देखभाल आणि इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत सातत्याने तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले आणि मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मॉलची पाहणी केली.

पाहणीदरम्यान पार्किंग परिसराची अत्यंत खराब अवस्था, देखभालीचा अभाव तसेच विविध नागरी सुविधांतील त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. व्यापाऱ्यांनीही बिल्डरच्या कथित निष्काळजीपणामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता कांबळे, शहर अभियंता रवींद्र पवार, अतिरिक्त अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे, बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण तसेच महानगरपालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

पाहणीनंतर महानगरपालिकेने बिल्डरला मॉलमधील सर्व आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच निर्धारित कालावधीत त्रुटी दूर न केल्यास आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवून मॉल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जे अँड डी मॉलमधील समस्यांची प्रशासनाने घेतलेली ही दखल व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. आता बिल्डर दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करतो की महानगरपालिका पुढील कायदेशीर कारवाई करते, याकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button