citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात स्पा सेंटरवर गुन्हे शाखेची धाड; अनैतिक व्यापार प्रकरणी एकाला अटक

तीन महिलांची सुटका; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त, सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने मोठी कारवाई करत सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच रोख रक्कम, मोबाईल, डीव्हीआर आणि इतर साहित्य असा सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-१ ला सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी चौक परिसरातील ‘रेडियंट सलून अँड स्पा’ येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बोगस पंटरच्या माध्यमातून खात्री करून दोन पंचांच्या उपस्थितीत नियोजनबद्ध छापा टाकला.

कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याचे उघड झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात भूषण नरेशराव वाघमारे याला अटक करण्यात आली. आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

छाप्यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत बोगस पंटरसाठी वापरण्यात आलेली रक्कम, ग्राहकांकडून मिळालेली रोकड, अँड्रॉइड मोबाईल, डीव्हीआर बॉक्स तसेच इतर साहित्य असा एकूण सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अनैतिक व्यापाराविरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळाले असून अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button