नागपुरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण; आरोपी अटकेत, पोलिसांची शहरभर जनजागृती मोहीम सुरू

नागपूरच्या कपिलनगर परिसरातून अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत केवळ कायदेशीर कारवाईच केली नाही, तर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी शहरभर एक मोठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
कपिलनगर पोलीस ठाण्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल केली. या प्रकरणात पीडित मुलगी एक महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.
याप्रकरणी भिलगाव येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय अभिषेक धनेश यादव या आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्याने करत आहेत.
दरम्यान, अशा विकृत घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
या पथकांमध्ये सहभागी असलेले पोलीस दीदी आणि पोलीस दादा दररोज शाळा, महाविद्यालये, ट्युशन क्लासेस आणि गार्डन परिसरात गस्त घालत आहेत. विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती देत त्यांचे समुपदेशन केले जात आहे.
तसेच पोक्सो कायद्यांतर्गत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढत असून आता मुले आणि मुली निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, पोलिसांनी पालक आणि नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात किंवा शाळा-ट्युशनला जाणाऱ्या मुलींना कोणी त्रास देत असल्यास किंवा कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. नागपूर पोलिसांची ही जनजागृती मोहीम भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.



