citynewsLatest NewsMaharashtraNanded

इंधन दरवाढ आणि टंचाईविरोधात नांदेड काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जोरदार घोषणाबाजी

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, इंधन टंचाईच्या मुद्द्यावर नांदेड काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

देशभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यातच अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीचा खर्च वाढला असून उद्योग, व्यवसाय आणि दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढीव दरात तात्काळ कपात करावी, राज्यातील इंधन टंचाई दूर करावी, सर्व पेट्रोल पंपांवर सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा आणि महागाई नियंत्रणासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीने घेण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

इंधन दरवाढ, महागाई आणि इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले असून, आता केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button