AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्याचा थरार; चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वनविभागाला यश

अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात आज दुपारी एक बिबट्या शिरल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या भावाच्या गोदामात सज्ज्यावर बसलेला बिबट्या दिसताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. वनविभाग, मनपा पशुवैद्यकीय विभाग आणि गाडगेनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत तब्बल चार तासांच्या थरारानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.

अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास एक बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या भावाच्या गोदामातील सज्ज्यावर हा बिबट्या बसलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच तातडीने श्रीचंद तेजवानी यांनी मनपा पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. बोंद्रे यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था उभारून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गोदामात लपलेल्या बिबट्याने वनकर्मचाऱ्यांना चकवा देत शेजारील अजय लुल्ला यांच्या निवासस्थानी धाव घेतली. तेथून तो पुढे प्रिन्स बारच्या इमारतीत गेला आणि पुन्हा अजय लुल्ला यांच्या घराकडे परतला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली.

वनविभागाचे पथक सतत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला ट्रँक्विलायझरचे इंजेक्शन मारण्यात यश मिळवले. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला.

मात्र इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत बिबट्या पुन्हा उठून पळाला. वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ट्रँक्विलायझरचा पूर्ण परिणाम होण्यासाठी साधारण दहा मिनिटांचा कालावधी लागतो. याच काळात बिबट्याने उंच उड्या मारत बंद पडलेल्या देशी दारू दुकानाच्या परिसरात आश्रय घेतला.

या धावपळीत एका वनकर्मचाऱ्यावर बिबट्याने झेप घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र संबंधित कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला आणि मोठी दुर्घटना टळली.

संपूर्ण परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. प्रत्येकजण बिबट्याच्या हालचाली पाहण्यासाठी उत्सुक होता. वनविभाग, पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना वारंवार सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.

अखेर सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास वनविभागाला मोठे यश मिळाले. बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडून पिंजऱ्यात बंद करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर जंगलातील सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या कसा पोहोचला, कोणत्या मार्गाने आला आणि त्यामागील कारण काय, याचा तपास आता वनविभागाकडून केला जाणार आहे.

रामपुरी कॅम्प परिसरात जवळपास चार तास सुरू असलेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा अखेर सुखद शेवट झाला असला तरी शहराच्या मध्यभागी बिबट्याची उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. वाढते शहरीकरण, जंगल क्षेत्रातील बदल की अन्य काही कारण… याचा शोध आता वनविभाग घेणार आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि बिबट्यालाही सुरक्षित पकडण्यात यश आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button