नागपूर पोलिसांच्या ताफ्यात ‘सेग वे’ स्कुटरची भर; तलाव आणि मार्केट परिसरात हायटेक पेट्रोलिंग सुरू

नागपूर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. शहरातील तलाव आणि गजबजलेल्या मार्केट परिसरात आता अत्याधुनिक सेग वे बॅलेन्सिंग स्कुटरवरून पोलीस पेट्रोलिंग करणार आहेत. नागपूर पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडल्याने कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती देण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त विपीन इटनकर, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
मिहान इंडिया लिमिटेड आणि नागपूर प्राधिकरण यांच्या सौजन्याने नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाला एकूण पाच सेग वे बॅलेन्सिंग स्कुटर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक स्कुटरचा वापर शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी केला जाणार आहे.
सोनेगाव तलाव परिसर, अंबाझरी-फुटाळा तलाव परिसर, सिताबर्डी मार्केट, सक्करदरा-ताजबाग परिसर आणि तहसील-इतवारी मार्केट परिसरात या स्कुटरवरून पोलीस गस्त घालणार आहेत. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
सेग वेवरून पेट्रोलिंग करताना अनाउन्समेंटद्वारे गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच घरफोडी, चोरी आणि महिलांसंबंधित गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागपूर शहर पोलीस दलात या आधुनिक सेग वे स्कुटरच्या समावेशामुळे सुरक्षाव्यवस्था अधिक गतिमान आणि प्रभावी होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नागपूर पोलिसांच्या या आधुनिक उपक्रमामुळे शहराच्या सुरक्षेला नवे बळ मिळणार असून तंत्रज्ञानाच्या मदतीने कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.



