नागपूरमध्ये सराईत वाहनचोर अटकेत; लकडगंज पोलिसांकडून तीन दुचाकी जप्त

नागपूरमध्ये वाहनचोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला लकडगंज पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले असून त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीतील मालधक्का रोड परिसरातील आहे. फिर्यादी हे रॉयल रेसीडेन्सी येथील एबीएस ट्रेडिंग कार्यालयात काम करतात. त्यांनी आपली बजाज सीटी 100 मोटारसायकल कार्यालयाबाहेर लॉक करून पार्क केली होती. काही वेळाने परत येऊन पाहणी केली असता त्यांची दुचाकी जागेवरून गायब असल्याचे आढळले.
आजूबाजूला शोध घेऊनही वाहन न मिळाल्याने त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजहर शेख आणि तपास पथकाने परिसरात गस्त वाढवली. याचदरम्यान गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, मालधक्का परिसरात एक संशयित इसम चोरीच्या दुचाकीसह फिरत आहे.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीची ओळख सुनिल सेवकराव राहंगडाले अशी पटली. सखोल तपासात आरोपीकडून लकडगंज परिसरातील चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७५ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपीकडून आणखी चौकशी सुरू आहे.
लकडगंज पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली असून नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा सतर्कता आणि तत्परतेचे उदाहरण दाखवून दिले आहे.



