भंडाऱ्यात अवैध रेती तस्करीवर वन विभागाचा मोठा प्रहार; दोन ट्रॅक्टरसह तिघे ताब्यात

भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रातून मोठी आणि धडाकेबाज कारवाई समोर आली आहे. अवैध रेती तस्करीवर वन विभागाने मध्यरात्री मोठा प्रहार करत दोन ट्रॅक्टर ट्रॉलींसह तिघांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूर वन विभागांतर्गत पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील संरक्षित कक्ष क्रमांक २६७ मध्ये ही थरारक कारवाई करण्यात आली. वन विभागाच्या गस्त पथकाला जंगल परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने सापळा रचत मध्यरात्री विशेष मोहीम हाती घेतली.
रात्री सुमारे अकराच्या सुमारास जंगलातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलींसह पकडण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमएच ४० बीजे ८१७१ आणि एमएच ४० सीक्यू ७१९१ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.
या कारवाईदरम्यान सुभाष धनू भलावी, नंदू राकेश सोनवणे आणि राजा शेवराव धुर्वे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त वाहने पुढील कारवाईसाठी पवनी येथील लाकूड डेपोमध्ये जमा करण्यात आली आहेत.
वन विभागाने अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पवनी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड यांनी स्पष्ट इशारा देत जंगल परिसरातील बेकायदेशीर रेती वाहतूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने वन विभागाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास आणि सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनरक्षक आणि जलद कृती दलाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेत ही कारवाई यशस्वी केली.
पवनी वनपरिक्षेत्रातील या धडक कारवाईमुळे रेती माफियांना मोठा धक्का बसला असून वन विभागाची ही कडक भूमिका आता अवैध उत्खननाला आळा घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



