Latest NewsMaharashtra Politics

२१ वर्षांत २५ बदल्या! तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार

तुकाराम मुंढे यांनी आज अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंढे यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत ही तब्बल २५ वी बदली ठरली आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांनंतरही त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कडक प्रशासनशैलीची वेगळी छाप सोडली आहे.

२००५ साली सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात करणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, जालना, वाशिम यांसारख्या शहरांमध्ये त्यांनी प्रशासनाची धुरा सांभाळली. नियमांचे काटेकोर पालन, भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिका आणि जनहिताचे निर्णय यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.

विशेष म्हणजे, दीड महिन्यांपूर्वीच मार्च २०२६ मध्ये त्यांची आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यांतच पुन्हा एकदा त्यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे. काही काळापासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात आता मुंढे यांच्या नियुक्तीकडे विशेष लक्ष लागले आहे.

राजकीय दबावाला न जुमानता कठोर निर्णय घेणारा अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी नव्या विभागात कोणते बदल घडवून आणणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

तुकाराम मुंढे यांच्या महत्त्वाच्या बदल्या

  • २००५ – प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
  • २००७ – उपविभागीय अधिकारी, देगलूर
  • २००८ – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर
  • २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग
  • २०११ – जिल्हाधिकारी, जालना
  • २०१४ – जिल्हाधिकारी, सोलापूर
  • २०१६ – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
  • २०१७ – सीईओ, पीएमपीएल पुणे
  • २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका
  • २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका
  • २०२२ – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
  • २०२३ – सचिव, पशुसंवर्धन व मराठी भाषा विभाग
  • २०२५ – दिव्यांग कल्याण विभाग
  • २०२६ – आपत्ती व्यवस्थापन विभाग
  • मे २०२६ – आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग

मुंढे यांच्या वारंवार बदल्यांवरून प्रशासनातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र प्रत्येक बदल्यानंतर नव्या जोमाने काम सुरू करणारे अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button