अमरावतीच्या मसानगंजमध्ये तीव्र पाणीटंचाई; आमदारांच्या श्रेयवादात पाणीपुरवठ्याचे काम रखडल्याचा आरोप

भीषण उन्हाळ्यात अमरावतीतील मसानगंज परिसर पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळत आहे. नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना आता या प्रश्नावर राजकारण रंगू लागले आहे. अमरावती आणि बडनेरा मतदारसंघातील आमदारांच्या श्रेयाच्या लढाईत पाणीपुरवठ्याचे कामच रखडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
अमरावतीतील मसानगंज परिसरात सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या मागे धावण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, परिसरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी योजना तयार करण्यात आली होती. मात्र काम सुरू होण्यापूर्वीच राजकारण सुरू झाल्याचा आरोप होत आहे.
मसानगंज परिसराचा काही भाग अमरावती मतदारसंघात तर काही भाग बडनेरा मतदारसंघात येतो. याच कारणावरून दोन्ही मतदारसंघातील आमदारांमध्ये श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कामाचे उद्घाटन कोण करणार आणि फलकावर कोणाचे नाव मोठे असणार यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.
नागरिकांनी आरोप केला आहे की, निवडणुकांमध्ये मतांसाठी दारात येणारे नेते आता पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर राजकारण करत आहेत.
या वादामुळे ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारीही संभ्रमात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पाणी ही मूलभूत गरज असताना त्यावरही राजकारण होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मसानगंजमधील नागरिकांना आता आश्वासन नाही तर पाणी हवे आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी श्रेयाच्या राजकारणातून बाहेर पडून नागरिकांची तहान कधी भागवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



